नमन माझे गुरुराया…!

श्रीगुरु पौर्णिमा अर्थात आपल्या आयुष्यातील गुरुप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा विशेष दिवस, या गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखले जाते. तसे पाहिले तर आपल्या परम वंदनीय गुरुंच्या प्रति आदरभाव हा नेहमीच आपल्या मनात असावा आणि तो आपल्या व्यावहारिक जीवनात आचरणात सुद्धा आणावा.
माणसाच्या कल्याणासाठी गुरुचे महत्व अनन्य साधारण आहे हे सर्वश्रुत आहे. आपल्या आयुष्याच्या विविध कार्यक्षेत्रातील गुरू हे वेगवेगळे असू शकतात. जसे की अभ्यासातील गुरू, नोकरी व्यवसायातील गुरू, विविध कला क्षेत्रातील गुरू, खेळातील गुरू,राजकीय गुरू, अध्यात्मिक गुरू…! आपल्या इच्छित ध्येया प्रति मार्गस्थ असणारे बरेचसे व्यक्ती आपल्या आयुष्यात विचारांना, ग्रंथांना, प्रतिकांना, अनुभवांना गुरू किंवा गुरुस्थानी मानतात आणि आयुष्यभर त्या विचारावर वाटचाल करतात. आजकाल समाजात मन दुःखी करणारा एक शब्द फार प्रचलित झालेला दिसतो तो म्हणजे कुणी कुणाचा गुरू नाही आणि कुणी कुणाचा चेला नाही. जा भारताला संपूर्ण जग गुरुस्थानी पाहायचे, जा भारतात अजूनही हजारो वर्षांची गुरू शिष्य परंपरा आहे त्याच परम पवित्र भारतात हा विचार रुजू होणे म्हणजे दुर्दैवच..!
राजकीय क्षेत्रात आपण राजकीय गुरू आणि त्यांचे शिष्य अशे अनेक उदाहरण पाहिले आणि आज तागायत अनुभवतो सुद्धा आहोत. त्या खेरीज आपल्या भारतात, आपल्या समाजात म्हणा वा आपल्या धर्मात म्हणा अध्यात्मिक क्षेत्रामधील गुरु शिष्य परंपरा तर अनादी अनंत काळा पासून चालत आलेली आपल्याला दिसते. अध्यात्मिक क्षेत्रात गुरू शिष्य परंपरेला तर अनन्य साधारण असे महत्व आहे. चरा चरात वास करणारे सद्गुरू भगवान श्री दत्तात्रय महाराज यांच्या प्रेरणेने आणि अनुग्रहाने आज सुद्धा अनेक गुरू शिष्य परंपरा भारतात अविरत सुरू आहेत.सर्वदूर पसरलेल्या ह्या परंपरा आप आपल्या कार्यक्षेत्रामध्ये संपूर्ण मानवजातीच्या कल्यांणा करिता अविरत कार्यमग्न असतात.
आपल्या आयुष्यातील सर्व प्रकारच्या उन्नती करीत गुरू शिवाय पर्याय नाही. म्हणूनच अभंग, दोहे, काव्य अशा विविध साहित्यां मार्फत अनेक थोर संत सत्पुरुषांनी गुरुची महानता व आवश्यकता विषद केली आहे. आपल्या आयुष्यात गुरुस्थानी कुणाला पाहावे ती शक्ती भेटायला, आपल्याला कळायला,ओळखायला आणि तिथे आपली निष्ठा बसायला जन्म जन्मांतरीचे पुण्य हवे असतात. एखाद्या पान टपरीवर घोळक्यात उभे राहून हे माझे गुरू आहेत आणि मी यांच्या मुळे घडलो आणि आज मी जे काही आहे ते यांच्या मुळे आहे असे म्हणणारे महाभाग व्यक्तिमत्व आपल्या आजूबाजूला आपल्याला दिसतात आणि काही कालावधी नंतर तेच आप आपसात भांडताना सुद्धा दिसतात. गुरू शिष्य संकल्पना ही एवढी तुच्छ असूच शकत नाही.
गुरूंच्या इच्छे साठी, त्यांच्या रक्षणासाठी जीवाची बाजी लावणारे अनेक शिष्य आपल्या पुण्यभूमी भारतात होऊन गेलेत. तसेच आपल्या शिष्याच्या सर्व प्रकारच्या उन्नतीसाठी सर्व प्रकारची शक्ती पणाला लावणारे गुरू तर महान आहेतच त्यांची सुद्धा परंपरा भारतात कमी नाही.
आपणा सारिखे करिती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी।।
माझा शिष्य माझ्या सिद्धतेचा माझ्या पेक्षाही श्रेष्ठ तयार व्हावा या भावनेतून त्याच्या आयुष्याच्या कल्याणासाठी अविश्रांत साधना करणाऱ्या, सगुण निर्गुण रूपात वास करणाऱ्या समर्थ सद्गुरुंच्या चरणी आपण सगळे नतमस्तक होऊ या..!

नितीन राजवैद्य
मुख्य संपादक विचारवेध.

 

(image credit www.chitrapurebooks.com)

Leave a Comment